बालपण कुठेतरी हरवलं आहे !!
हरवलं आहे !
बालपण कुठेतरी हरवलं आहे !!
वर्णन – अगदी तुमच्या मुलासारखाच.
कपडे – मळलेले, घाणेरडे,
गुढघे आणि कोपरं फुटलेलं आणि तरीही हसणारं बाळ !
माघे पाहिलं होतं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत,
पण समर कॅम्पला टाकल्यापासून ना
मी त्याला शोधत आहे
आधी किती दंग करायचा,
आता कदाचित dance class ला असणार !
पावसात ना , एखाद्या champion सारखा फूटबॉल खेळायचा,
धपाधप पडायचा, पण डोळ्यांतून आसू नाही
आता …. त्या पोसिबल इन्फेक्शन च्या भीतीने
बालपण कुठेतरी हरवलं आहे !!
पावसामुळे शाळेतून लवकर येताना
माघे पाहिलं होतं त्याला ..
रस्त्यावरच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत उडी मारून
गड्यांना भिजवत होता तो !
वाहणाऱ्या पाण्यात कागदी होड्या सोडून
विज्ञानाचे प्रयोग करत शिकत होता तो .
उडणाऱ्या फूलपाखरांपासून तो मिळवत होता रंग
आणि साचलेल्या पाण्यात दगडांचे टप्पे मिळवण्यात
व रेशिमकीडे शोधण्यात स्वारी राहायची दंग
आता .. स्कूलबसच्या चार चाकांवर आणि
घरी वाट पाहणाऱ्या आईच्या सचिंत नजरेत,
बालपण कुठेतरी हरवलं आहे !!
माघे पाहिलं होतं त्याला एकदा,
त्या झोपडपट्टीतल्या पोरांसोबत क्रिकेट खेळताना,
आणि विकेट घेतल्यावर बेभानपणे नाचताना.
भर उन्हात , घामेजलेल्या चेहऱ्यावर
ती जिंकण्याची जबरदस्त उर्मी पाहिली होती.
आता … डोरेमॉन -पोकिमॉनच्या दुनियेत,
nowadays, you know, it’s too unsafe playing outside!
जावूद्या – बालपण कुठेतरी हरवलं आहे !!
माघे पाहिलं होतं त्याला एकदा,
गणपतीची पट्टी मागायला आला होता,
अगदी तहानभूक विसरून तो
कॉलनी मधल्या गणपतीची सजावट करायचा.
दहा दिवस फक्त – “गणपती बाप्पा मोरया !!”
आता- कॉम्पिटिशन – ” life is a race! अगर भागोगे नही
तो कोई आपको कुचलकर आपसे आगे निकल जायेगा !!”
बालपण कुठेतरी हरवलं आहे !!
माघे पाहिलं होतं त्याला एकदा,
आठाण्याची तिरंगी कुल्फी आणि चाराण्याचं बोरकूट –
आपल्या सर्वात जवळच्या मित्रांसोबत share करताना,
आणि त्या कुल्फिवाल्याकडून घेतलेला बर्फाचा तुकडा
गालावर लावण्याचा मनमुराद आनंद घेताना …
आता … आजच्या कॉम्प्लान बॉईज्ना
फक्त healthy & hygienic डायटच लागतं !
बालपण कुठेतरी हरवलं आहे !!
बालपण कुठेतरी हरवलंय ,
कोणाला जर सापडलं, तर त्यांनी प्लिज कळवावं …
कारण दोन चिमुकले डोळे त्याची वाट पाहत आहेत …
त्या बंद दारामध्ये किंवा
त्या स्कूलबस मध्ये किंवा
त्या खडूस मॅडम च्या क्लास मध्ये किंवा
त्या so called caring मायबापांच्या अतिचीन्तेमध्ये ….
Recent Posts
Stories of impact: Phulwaris of Anuppur
The Climate Change Mitigation Potential
Organic food export can transform economy
+0123 (456) 7899
contact@example.com